नाती, भावना हे तसे सुद्धा आवडीचे विषय लिहिण्यासाठी. त्यातही आज सगळ्यात जवळचं नातं आणि त्या नात्याशी निगडीत भावना मनात रुंजी घालत आहेत. लिहिलं तर खूप भावनिक होईल का असा विचार मनात डोकावत असतानाच लिहिलं तर मोकळं वाटेल हेही जाणवलं आणि मग त्यातून लिहिला गेला हा लेख…
मुलं आणि वडील यांच्या नात्याबद्दल लिहिताना हमखास ते मुलं आणि आई यांच्या नात्याशी compare केलं जातं. मुलं आईशी मोकळेपणानं बोलतात पण वडिलांशी अंतर ठेवून वागतात… मनातल्या गोष्टी सांगायला आई पण कठीण प्रसंग आला तर बाबा...या आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. पण ही तुलना न करताही ही दोन्ही नाती आपापल्या जागी खास असतात. काळानुरूप या नात्यांमध्येही बरीच स्थित्यंतरं आली आहेत. आपलं आपल्या बाबांबरोबरचं नातं आणि आपलं आपल्या मुलांबरोबरचं नातं यात काही फरक प्रकर्षाने जाणवतात. आपण मोठं होत असताना 'प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्' ही उक्ती अगदी खरी ठरायची. तोपर्यंत आणि अगदी त्यानंतर सुद्धा ती आदरयुक्त भीती कायम असायची...rather असते...अगदी शेवटपर्यंत. आपलं काही चुकलं किंवा चुकतंय असं वाटलं तरी बाबा आधी डोळ्यासमोर यायचे. आणि मग आपसूकच चुकणारं पाऊल बरोबर मार्गी लागायचं. बाबा म्हणजे शिस्त, बाबा म्हणजे धाक, बाबा म्हणजे heroच… कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग काढू शकणारे. पालकांच्या अपेक्षांचं ओझं अंगावर वागवणारी मुलं सगळ्यांना दिसतात. पण आपल्या मुलांसाठी येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करत कधी हार न मानणारे पालक सगळ्यांना दिसतीलच असं नाही. कळत नकळत आपणही आपल्या पालकांवर कधी हार न मानण्याच्या अपेक्षांचं ओझं टाकत असतो. आज पालक झाल्यावर या गोष्टी प्रकर्षाने जाणवतायत. आज जेव्हा लेकीला तिच्या बाबाशी खेळताना बघते तेव्हा जाणवतं की कदाचित आपल्या बाबांबरोबरचं नातं अजून वेगळ्या पद्धतीने निभावता आलं असतं. माझ्यासाठी 'अहो बाबा' होते, तिच्यासाठी 'अरे बाबा' आहे. माझ्या लहानपणी आदरयुक्त भीती होती, तिच्यासाठी ती निखळ मैत्री आहे. मला लहानपणी बाबा त्यांच्या कामामुळे कमी भेटायचे. माझ्या लेकीला माझ्यापेक्षा जास्त वेळ तिचा बाबा देतो. पण हे सगळं असूनसुद्धा बाबांबरोबरचं नातं हे आजही मनाच्या सर्वात जवळचं आहे.
लहान असताना रस्ता ओलांडताना पकडलेला बाबांचा हात...समुद्रात पाय बुडवून उभं असताना, पायाखालची वाळू सरकत असताना पडू नये म्हणून पकडलेला बाबांचा हात...पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला तेव्हा frame adjust करून देणारा बाबांचा हात...काही चांगलं केलं की पाठीवर शाबासकीची थाप मारणारा बाबांचा हात…नमस्कार केल्यावर आशीर्वाद म्हणून मायेने डोक्यावर फिरणारा बाबांचा हात...मोठं झाल्यावर escalator वर चढताना ते पडू नयेत म्हणून पकडलेला बाबांचा हात…वयाच्या पन्नाशीला computer शिकताना mouse हाताळताना पकडलेला त्यांचा हात...लग्न होऊन सासरी जाताना त्यांना घट्ट मिठी मारून रडताना, एकीकडे स्वतःचे अश्रू सावरत दुसरीकडे मला मायेने थोपटणारे बाबांचे हात...पुढे नातीमध्ये लेकीचं बालपण शोधत तिला अंगाखांद्यावर खेळवणारे त्यांचे हात...हॉस्पिटलमध्ये असंख्य tubes आणि pipes मध्ये वेधले गेले असतानासुद्धा मला पाहिल्यावर 'मी बरा आहे' हे सांगण्यासाठी किंचित उंचावलेला बाबांचा हात…त्यांच्या आजारपणाच्या काळात 'होईल सगळं ठीक' असं सांगण्यासाठी हातात घेतलेला त्यांचा हात आणि तेव्हा माझ्या मनाची घालमेल ओळखून मलाच धीर देण्यासाठी अलगदपणे माझ्या हातावरची पकड घट्ट करणारा त्यांचा हात...आणि ते गेल्यावर शेवटचा हातात घेतलेला त्यांचा थंड, निर्जीव झालेला हात...आयुष्यात हे सगळे क्षण आणि त्या निपचित हाताचे वजन मी शेवटपर्यंत विसरू शकणार नाही.
Happy Father's Day to all the lovely dads out there👍💓
-शुभदा अनंत मेथर