जग माझ्या चष्म्यातून
Wednesday, March 8, 2023
Women's Day
Friday, April 30, 2021
मळभ
एप्रिल मे मधली टळटळीत दुपार असली की अंगाचं कसं पाणी पाणी होतं. 'कसलं मरणाचं ऊन होतं' असं सहज तोंडातून निघून जातं. हल्ली तर मार्च पासूनच उन्हाचे वारे वाहायला लागतात. आणि मग अचानक एके दिवशी सकाळी ऊन गायब होतं. उकाडा तेवढाच पण ऊन नाही...झाडाचं पान हलत नाही. आकाशात ढग दाटतात. पण ते ना धड पाऊस वाहून आणलेले जडसर काळे असतात ना कापूस पिंजल्यासारखे हलके फुलके पांढरे असतात. कुठेतरी मधल्यामधे…पण सूर्य झाकोळून टाकण्यासाठी पुरेसे असतात. ऊन नाही म्हणून बरं वाटावं तर उकाड्याने जीव हैराण. थोड्या थोड्या वेळाने खिडकी बाहेर लक्ष जात राहातं. पण सूर्यनारायण काही दर्शन देत नाहीत. 'मळभ आहे आज. पाऊस पडणार असं दिसतंय'...सहज तेही तोंडातून निघून जातं. पावसाची शक्यता वर्तवत आपण आपल्या कामात मग्न होतो. लक्ष मात्र खिडकीबाहेर…'अजून मळभ आहेच' आपण स्वतःशीच पुटपुटतो. थोडा वारा सुटलाच तर मागून पाऊस येतो. आणि आलाच तर मळभ दूर होतं. आभाळ उघडतं. क्वचित सूर्यनारायण दर्शन देऊन जातात. नाहीतर पाऊस पडून थोडा गारवा तरी येतो वातावरणात. पण पाऊस नाही आला तर मात्र कोंडल्या सारखं वाटायला लागतं...घुसमटल्या सारखं. यापेक्षा ऊन परवडलं असं काहीतरी वाटून जातं. आणि आपण वाट पाहत बसतो...खिडकीबाहेर नजर टाकत, मळभ दूर होण्याची.
मनावरही असं मळभ येतं कधी कधी. मरगळीचे, आळसाचे ढग गर्दी करतात. धड कामही होत नाही आणि धड आरामही नाही. मनमोकळा आनंदही नाही आणि जिव्हारी लागणारं दुःखही नाही. मधल्या मधे झुरणारं मनावरचं मळभ. त्यावर उपाय दोनच...आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टीत मन रमवावं, कामात झोकून द्यावं. किंवा मनात साचलेलं सगळं बाहेर काढावं…लिहून, बोलून किंवा आपल्या जवळच्यांकडे व्यक्त होऊन. दोन्ही नाही शक्य झालं की मळभ दाट होऊ लागतं...मनावरचं ओझं वाढवत वाढवत. मग कुठूनसा वारा येतो...निमित्त होतं आणि अश्रू वाहू लागतात. त्यांना वाहू द्यावं तसंच…ढगात साठलेला पाऊस बरसतो तसं. तो पडून गेला की बरं वाटतं...मोकळं वाटतं. मळभ दूर होतं मग मनावरचं.
आजकालचे दिवस पाहता आजूबाजूला आणि मनावर मळभ दाटून येण्याच्या शक्यता दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शारीरिक आरोग्याची काळजी घेता घेता मानसिक आरोग्यावर पण विशेष लक्ष असू द्यात. आपलं मळभ दाटू लागलं की ज्यात मन रमेल अशा गोष्टींसाठी वेळ काढावा. ज्यांच्याकडे व्यक्त होता येइल अशा व्यक्ती आजूबाजूला असाव्यात. आणि जर आपण धडधाकट असू तर आपल्या जवळच्या व्यक्तींवर थोडं लक्ष ठेवावं. न जाणो आपल्यामुळे कदाचित त्यांचं मळभ दूर व्हावं...
-शुभदा
Thursday, November 5, 2020
वेगळं…
प्रत्येकाचं हसणं वेगळं
प्रत्येकाचं रुसणं वेगळं
दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं
प्रत्येकाचा चेहरा वेगळा
प्रत्येकाचा रंग वेगळा
माणसा माणसाकडे पाहायचा
प्रत्येकाचा ढंग वेगळा
गुण-अवगुणांच्या हिशोबाने प्रत्येकाचं दिसणं वेगळं
दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं
प्रत्येकाची स्वप्नं वेगळी
प्रत्येकाचा ध्यास वेगळा
ध्येयापाठी धावतानाचा
प्रत्येकाचा प्रवास वेगळा
प्रत्येकाच्या खाती असतं नशीब नावाचं भांडवल वेगळं
दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं
संकटांना सामोरं जायची प्रत्येकाची हिंमत वेगळी
प्रत्येकाने मोजलेली मन:शांतीची किंमत वेगळी
काळापुढे हात न टेकता पुन्हा नव्याने लढणं वेगळं
दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं
प्रत्येकाच्या भावना वेगळ्या
व्यक्त व्हायची रीत वेगळी
एकमेकांना समजून घ्यायची
प्रत्येकाची प्रीत वेगळी
कधी वाटतं तुला कळावं न सांगता सारं सगळं
पण...दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं
समजा सगळीच माणसं
जर एकसारखी असली असती
कंटाळा येऊन जगण्यात मग
मजा काही राहिली नसती
'जितकी लोकं तितक्या तऱ्हा' हाच नियम बरा आहे
आपापल्या तऱ्हा जपणं हाच हेतू खरा आहे
लवकर जमतं ज्याला हे, त्याच्या नशिबी सुख सगळं
कारण...
दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं
-शुभदा
०५.११.२०२०
Saturday, July 25, 2020
खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा आणि मी
दिवसाच्या सुरवातीला कामांची उजळणी...
गॅसवर उकळणारा आलं घातलेला चहा…
'चला उठा सकाळ झाली' ची हाक…
अर्धवट झोपेतले पेंगूळलेले डोळे…
इवल्याशा हातांचा गळ्याभोवती विळखा…
दोन मिनिटांत दात घासून पाच मिनिटांत आंघोळ...
नाश्ता पोटात ढकलताना मिळालेला घटकेचा आराम…
खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…
स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मी…
एकीकडे कांदा तर दुसरीकडे टोमॅटो…
कापलेल्या भाज्यांनी बघितलेली मुक्तीची वाट...
कुकरची नेमकी न मोजलेली शिट्टी…
राई-जिरं-कडीपत्त्याची खमंग फोडणी…
तव्यावर गरागरा फिरणारी टम्म फुगलेली चपाती…
इतक्यात वाजलेला ऑफिसचा फोन…
Will revert shortly हे ठरलेलं उत्तर…
खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…
दाटून आलेले ढग आणि मी…
Inbox मध्ये आलेला emails चा पूर…
चार वेळा डोळ्याखालून घातलेली एकच document…
Confcall संपायची आतुरतेने बघितलेली वाट…
त्यात प्रश्न विचारणाऱ्यांना mute वर घातलेल्या शिव्या…
कडकडून भुकेने पोटात ओरडणारे कावळे…
दुपारची जेवणं आणि भांड्यांचा ढीग…
भांडी उरकताना आठवलेली ऑफिसची deliverables…
खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…
रिपरिप सुरू झालेला पाऊस आणि मी…
फोन calls आणि emails नी भिरभिरलेलं डोकं…
Laptop च्या स्क्रीनवर खिळलेले डोळे…
दमून भागून दिलेली एक मोठी जांभई…
अजून अवकाश आहे सांगणारं घड्याळ…
शेजारी बिलगून झोपलेलं काळजीमुक्त पोर…
बालपणच बरं होतं याची पुनःश्च जाणीव…
पुन्हा वास्तवात घेऊन येणारा बॉसचा ई-मेल…
खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…
पावसाचा अचानक वाढलेला जोर आणि मी…
संध्याकाळचा चहा आणि जेवणाची तयारी…
न संपणारी कामं उद्यावर ढकलायची लगबग…
बरंचसं काम पूर्ण झाल्याचा सुस्कारा…
आजूबाजूला पसरलेला खेळण्यांचा ढीग…
लेकीबरोबर पुन्हा लहान होऊन खेळण्याची गंमत…
आनंदाने येऊन बिलगलेले छोटेसे हात…
उद्याच्या लढाईसाठी मिळालेलं मणभर बळ…
खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…
संधीप्रकाशाचा मनोहारी खेळ आणि मी…
म्हणता म्हणता झालेली दिवसाची रात्र…
उद्याची तयारी करून विसावलेला जीव…
गोष्टी ऐकून झोपी गेलेले चिमुकले डोळे…
Earphonesवर गुंजत असलेलं 'फिर वही रात है'...
बाहेर रस्त्यावर सामसूम आणि मंद सुटलेला वारा…
हातात कॉफीचा कप आणि सोबत आठवणींचा दरवळ…
mobileमध्ये कैद झालेल्या सहज सुचलेल्या ओळी…
खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…
ढगामागून डोकावणारा एक मुक्त चंद्र आणि मी…
-शुभदा
Sunday, July 5, 2020
Lockdown वाढदिवस
यावर्षी आपल्यापैकी बऱ्याच जणांचे वाढदिवस lockdown मध्ये साजरे झाले. नेहमीपेक्षा वेगळ्या असणाऱ्या या celebration बद्दल हे थोडे पांढऱ्यावर काळे…
अगदी लहानपणापासून मला वाढदिवसाचे भारी कौतुक. सुदैवाने जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं हे कौतुक कमी होण्याऐवजी अजून वाढतच गेलं. फक्त त्या कौतुकाचं स्वरूप थोडं बदलत गेलं. आपल्या वाढदिवसादिवशी खूप शुभेच्छा आपल्याला मिळाव्यात एवढीच काय ती अपेक्षा. मला आठवतं एकदा शाळेत असताना नवीन वर्ग असल्याने कोणीच मला वाढदिवसादिवशी wish नव्हतं केलं. कारण कोणाला माहीतच नव्हतं की त्यादिवशी माझा वाढदिवस होता. तसंच काहीसं पुढे पहिल्या job च्या वेळी ऑफिस मध्ये झालं. आणि मग मी ठरवून टाकलं की बस...आता यापुढे आपला वाढदिवस आपणच साजरा करायचा. खूप खुश राहायचं त्यादिवशी. स्वतःला एक मस्त gift द्यायचं. आपल्या घरच्यांसोबत, जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत दिवस घालवायचा.
जे मला जवळून ओळखतात त्यांना माहीत आहे की मी कसं वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासूनच 'मेरा birthday आ रहा है...मेरा birthday आ रहा है' अशी दवंडी पिटवायला सुरुवात करते. एरवी वर्षभर अतिशय matured, थोडीशी serious असा आविर्भाव असणारी मी, वाढदिवसाच्या काही दिवस आधी वयापेक्षा पाच दहा वर्षं लहान होऊन जगण्यात आनंद मानते. कोणाला ते बालिश वाटेल का याबद्दल अजिबात विचार न करता मुक्तपणे स्वतःची हौस भागवण्याचा तो एक प्रयत्न असतो. यावर्षीही उत्साह तोच आहे. पण वाढदिवसाचे स्वरूप थोडे बदलले आहे. यावर्षी वाढदिवस आला तो lockdownच्या काळात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे cakes ची रेलचेल नाही की स्वतःसाठी नवीन कपडे किंवा gift खरेदी करणं नाही. थोडक्यात tangibles नाहीत. पण ते नसल्यामुळे हा वाढदिवस अजून खास झाला आहे. Intangibles चे महत्व अजून प्रकर्षाने जाणवतंय. आजूबाजूला आपल्यावर प्रेम करणारी आपली माणसं असावीत आणि सोबत मनापासून दिल्या गेलेल्या शुभेच्छा…बस एवढ्यावर सुद्धा वाढदिवस साजरा होऊ शकतो हे या lockdown च्या निमित्ताने नव्याने कळतंय.
तशा वाढदिवसाला मिळणाऱ्या शुभेच्छा वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. काही मंडळी रात्री बाराच्या ठोक्याला wish करतात, तर काही दुसऱ्या दिवशी. काही अजूनही हक्काने call करतात, काही whatsapp वर शुभेच्छा देतात तर काही facebook वर. यावेळच्या lockdown मुळे video calls वरही शुभेच्छा दिल्या जात आहेत. यासगळ्यांमध्ये रात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा द्यायला मला विशेष आवडतात. वाढदिवस हा वर्षातला एक खास दिवस असतो, त्यामुळे त्याच्या पहिल्या मिनिटापासूनच तो दिवस त्या व्यक्तीसाठी साजरा व्हावा हा त्यामागे हेतू असतो. अर्थात काही जणांना तो अतिउत्साह वाटतो. मी आजही शक्य असेल तेव्हा रात्री बारा वाजता whatsapp वर message करून wish करणं prefer करते. पण समोरून 'एवढं कशाला जागायचं?' असा सूर आला तर मात्र हात आवरता घेते. आपल्या शुभेच्छांचं समोरच्याला ओझं वाटू नये हेही तितकंच महत्त्वाचं. मला वाढदिवसादिवशी birthday note लिहायलाही आवडतं. अर्थात फक्त त्यांच्यासाठी ज्यांना त्या वाचायला आवडतं. एकूणच, ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात काही सुखाचे, आनंदाचे क्षण आले असतील त्या सगळ्यांच्या वाढदिवसादिवशी आपल्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अधिक खास करावा असं मला वाटतं.
यावर्षी घरातच असल्यामुळे विचार करायला, स्वतः कडे पाहायला वेळ आहे. डोक्यावरचे grey hair of knowledge वाढत चालले आहेत. चेहऱ्यावर अजून सुरकुत्या नाही पडल्या याचं समाधान आहे. मनापासून हसलं की सुरकुत्या पण लपतात म्हणे. त्यामुळे वय वाढेल तसं अजून जास्त हसत राहायचं म्हणतेय. आपल्याला काय करायला आवडतं आणि काय अजिबातच नाही आवडत याची पक्की यादी एव्हाना तयार झाली आहे. त्यानुसार आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करून आनंदी राहायचं हा एकच agenda आहे. आयुष्य almost mid life point वर येऊन पोचलेय. उत्तरार्ध हा पूर्वार्धापेक्षा अधिक exciting असेल अशी आशा आहे. अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, बरेचसे अनुभव घेणं बाकी आहे. बाबा आजारी असताना एक मैत्रीण म्हणाली होती की त्यांचं जगण्यावर प्रेम आहे त्यामुळे ते यातूनही बरे होतील. आणि त्यांनी तशी recovery सुद्धा दाखवली होती. त्यामुळे यापुढे त्यांच्यासारखं जगण्यावर प्रेम करायचं आहे. न जाणो पुढे कधी गरज पडलीच तर तेच पुन्हा उभं राहण्यात मदत करेल.
इथे एकीकडे आई घरी cake बनवण्याची तयारी करतेय. नवरा आणि भाऊ lockdown मध्ये सुद्धा काहीतरी gift deliver होऊ शकेल का ते check करतायत. लेक piggy bank मध्ये जमा असलेले पैसे वापरून dress gift करणार म्हणतेय. यावर्षी lockdown मुळे माझ्या ऑफिसमधल्या दोन जिवलग मैत्रिणींना भेटता येणार नाहीये याचं थोडं वाईट वाटतंय. पण या सगळ्यात आपण यावर्षी जिवंत आहोत 'हेही नसे थोडके' असं समजून मी देवाचे मनोमन आभार मानतेय. शेवटी आपण आणि आपल्या जवळची माणसं जिथे आहोत तिथे सुखरूप आहोत हे समाधानच यावर्षीच्या lockdown वाढदिवसाचं सगळ्यात मोठं gift आहे.
-शुभदा
Sunday, June 21, 2020
थांब ना रे तू...बाबा…
नाती, भावना हे तसे सुद्धा आवडीचे विषय लिहिण्यासाठी. त्यातही आज सगळ्यात जवळचं नातं आणि त्या नात्याशी निगडीत भावना मनात रुंजी घालत आहेत. लिहिलं तर खूप भावनिक होईल का असा विचार मनात डोकावत असतानाच लिहिलं तर मोकळं वाटेल हेही जाणवलं आणि मग त्यातून लिहिला गेला हा लेख…
मुलं आणि वडील यांच्या नात्याबद्दल लिहिताना हमखास ते मुलं आणि आई यांच्या नात्याशी compare केलं जातं. मुलं आईशी मोकळेपणानं बोलतात पण वडिलांशी अंतर ठेवून वागतात… मनातल्या गोष्टी सांगायला आई पण कठीण प्रसंग आला तर बाबा...या आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. पण ही तुलना न करताही ही दोन्ही नाती आपापल्या जागी खास असतात. काळानुरूप या नात्यांमध्येही बरीच स्थित्यंतरं आली आहेत. आपलं आपल्या बाबांबरोबरचं नातं आणि आपलं आपल्या मुलांबरोबरचं नातं यात काही फरक प्रकर्षाने जाणवतात. आपण मोठं होत असताना 'प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्' ही उक्ती अगदी खरी ठरायची. तोपर्यंत आणि अगदी त्यानंतर सुद्धा ती आदरयुक्त भीती कायम असायची...rather असते...अगदी शेवटपर्यंत. आपलं काही चुकलं किंवा चुकतंय असं वाटलं तरी बाबा आधी डोळ्यासमोर यायचे. आणि मग आपसूकच चुकणारं पाऊल बरोबर मार्गी लागायचं. बाबा म्हणजे शिस्त, बाबा म्हणजे धाक, बाबा म्हणजे heroच… कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग काढू शकणारे. पालकांच्या अपेक्षांचं ओझं अंगावर वागवणारी मुलं सगळ्यांना दिसतात. पण आपल्या मुलांसाठी येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करत कधी हार न मानणारे पालक सगळ्यांना दिसतीलच असं नाही. कळत नकळत आपणही आपल्या पालकांवर कधी हार न मानण्याच्या अपेक्षांचं ओझं टाकत असतो. आज पालक झाल्यावर या गोष्टी प्रकर्षाने जाणवतायत. आज जेव्हा लेकीला तिच्या बाबाशी खेळताना बघते तेव्हा जाणवतं की कदाचित आपल्या बाबांबरोबरचं नातं अजून वेगळ्या पद्धतीने निभावता आलं असतं. माझ्यासाठी 'अहो बाबा' होते, तिच्यासाठी 'अरे बाबा' आहे. माझ्या लहानपणी आदरयुक्त भीती होती, तिच्यासाठी ती निखळ मैत्री आहे. मला लहानपणी बाबा त्यांच्या कामामुळे कमी भेटायचे. माझ्या लेकीला माझ्यापेक्षा जास्त वेळ तिचा बाबा देतो. पण हे सगळं असूनसुद्धा बाबांबरोबरचं नातं हे आजही मनाच्या सर्वात जवळचं आहे.
लहान असताना रस्ता ओलांडताना पकडलेला बाबांचा हात...समुद्रात पाय बुडवून उभं असताना, पायाखालची वाळू सरकत असताना पडू नये म्हणून पकडलेला बाबांचा हात...पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला तेव्हा frame adjust करून देणारा बाबांचा हात...काही चांगलं केलं की पाठीवर शाबासकीची थाप मारणारा बाबांचा हात…नमस्कार केल्यावर आशीर्वाद म्हणून मायेने डोक्यावर फिरणारा बाबांचा हात...मोठं झाल्यावर escalator वर चढताना ते पडू नयेत म्हणून पकडलेला बाबांचा हात…वयाच्या पन्नाशीला computer शिकताना mouse हाताळताना पकडलेला त्यांचा हात...लग्न होऊन सासरी जाताना त्यांना घट्ट मिठी मारून रडताना, एकीकडे स्वतःचे अश्रू सावरत दुसरीकडे मला मायेने थोपटणारे बाबांचे हात...पुढे नातीमध्ये लेकीचं बालपण शोधत तिला अंगाखांद्यावर खेळवणारे त्यांचे हात...हॉस्पिटलमध्ये असंख्य tubes आणि pipes मध्ये वेधले गेले असतानासुद्धा मला पाहिल्यावर 'मी बरा आहे' हे सांगण्यासाठी किंचित उंचावलेला बाबांचा हात…त्यांच्या आजारपणाच्या काळात 'होईल सगळं ठीक' असं सांगण्यासाठी हातात घेतलेला त्यांचा हात आणि तेव्हा माझ्या मनाची घालमेल ओळखून मलाच धीर देण्यासाठी अलगदपणे माझ्या हातावरची पकड घट्ट करणारा त्यांचा हात...आणि ते गेल्यावर शेवटचा हातात घेतलेला त्यांचा थंड, निर्जीव झालेला हात...आयुष्यात हे सगळे क्षण आणि त्या निपचित हाताचे वजन मी शेवटपर्यंत विसरू शकणार नाही.
Happy Father's Day to all the lovely dads out there👍💓
-शुभदा अनंत मेथर
Sunday, June 14, 2020
समुद्र…
Women's Day
#womensday2023 This morning when my maid didnt turn up, I took over the charge and cooked our meal like any other day. The last minute chan...
-
नाती, भावना हे तसे सुद्धा आवडीचे विषय लिहिण्यासाठी. त्यातही आज सगळ्यात जवळचं नातं आणि त्या नात्याशी निगडीत भावना मनात रुंजी घालत आहेत. लिहिल...
-
अगदी लहानपणापासून माझं समुद्रावर भारी प्रेम. कोकणात थेट किनारपट्टीवर गाव. त्यामुळे लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत आमची समुद्र ...
-
Valentine Day जवळ आला की एकूणच सगळीकडे प्रेम, त्याच्याशी निगडित गोष्टी दिसायला लागतात. मग त्या tv serials असो किंवा advertisements किंवा g...