Saturday, July 25, 2020

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा आणि मी

दिवसाच्या सुरवातीला कामांची उजळणी...

गॅसवर उकळणारा आलं घातलेला चहा…

'चला उठा सकाळ झाली' ची हाक…

अर्धवट झोपेतले पेंगूळलेले डोळे…

इवल्याशा हातांचा गळ्याभोवती विळखा…

दोन मिनिटांत दात घासून पाच मिनिटांत आंघोळ...

नाश्ता पोटात ढकलताना मिळालेला घटकेचा आराम…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मी…


एकीकडे कांदा तर दुसरीकडे टोमॅटो…

कापलेल्या भाज्यांनी बघितलेली मुक्तीची वाट...

कुकरची नेमकी न मोजलेली शिट्टी…

राई-जिरं-कडीपत्त्याची खमंग फोडणी…

तव्यावर गरागरा फिरणारी टम्म फुगलेली चपाती…

इतक्यात वाजलेला ऑफिसचा फोन…

Will revert shortly हे ठरलेलं उत्तर…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

दाटून आलेले ढग आणि मी…


Inbox मध्ये आलेला emails चा पूर…

चार वेळा डोळ्याखालून घातलेली एकच document…

Confcall संपायची आतुरतेने बघितलेली वाट…

त्यात प्रश्न विचारणाऱ्यांना mute वर घातलेल्या शिव्या…

कडकडून भुकेने पोटात ओरडणारे कावळे…

दुपारची जेवणं आणि भांड्यांचा ढीग…

भांडी उरकताना आठवलेली ऑफिसची deliverables…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

रिपरिप सुरू झालेला पाऊस आणि मी…


फोन calls आणि emails नी भिरभिरलेलं डोकं…

Laptop च्या स्क्रीनवर खिळलेले डोळे…

दमून भागून दिलेली एक मोठी जांभई…

अजून अवकाश आहे सांगणारं घड्याळ…

शेजारी बिलगून झोपलेलं काळजीमुक्त पोर…

बालपणच बरं होतं याची पुनःश्च जाणीव…

पुन्हा वास्तवात घेऊन येणारा बॉसचा ई-मेल…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

पावसाचा अचानक वाढलेला जोर आणि मी…


संध्याकाळचा चहा आणि जेवणाची तयारी…

न संपणारी कामं उद्यावर ढकलायची लगबग…

बरंचसं काम पूर्ण झाल्याचा सुस्कारा…

आजूबाजूला पसरलेला खेळण्यांचा ढीग…

लेकीबरोबर पुन्हा लहान होऊन खेळण्याची गंमत…

आनंदाने येऊन बिलगलेले छोटेसे हात…

उद्याच्या लढाईसाठी मिळालेलं मणभर बळ…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

संधीप्रकाशाचा मनोहारी खेळ आणि मी…


म्हणता म्हणता झालेली दिवसाची रात्र…

उद्याची तयारी करून विसावलेला जीव…

गोष्टी ऐकून झोपी गेलेले चिमुकले डोळे…

Earphonesवर गुंजत असलेलं 'फिर वही रात है'...

बाहेर रस्त्यावर सामसूम आणि मंद सुटलेला वारा…

हातात कॉफीचा कप आणि सोबत आठवणींचा दरवळ…

mobileमध्ये कैद झालेल्या सहज सुचलेल्या ओळी…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

ढगामागून डोकावणारा एक मुक्त चंद्र आणि मी…


-शुभदा

2 comments:

  1. He sagla majhya dolyasamor ubha rahila. Agadi tya kitchen chi khidki,khelnyancha dheeg, tula bilagleli Gargi Ani alyacha chaha cha vaas
    Apratim!!! Kitti sundar lihite tu!!

    ReplyDelete

Women's Day

#womensday2023  This morning when my maid didnt turn up, I took over the charge and cooked our meal like any other day. The last minute chan...