Thursday, November 5, 2020

वेगळं…


प्रत्येकाचं हसणं वेगळं

प्रत्येकाचं रुसणं वेगळं

दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं


प्रत्येकाचा चेहरा वेगळा

प्रत्येकाचा रंग वेगळा

माणसा माणसाकडे पाहायचा

प्रत्येकाचा ढंग वेगळा

गुण-अवगुणांच्या हिशोबाने प्रत्येकाचं दिसणं वेगळं

दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं


प्रत्येकाची स्वप्नं वेगळी

प्रत्येकाचा ध्यास वेगळा

ध्येयापाठी धावतानाचा

प्रत्येकाचा प्रवास वेगळा

प्रत्येकाच्या खाती असतं नशीब नावाचं भांडवल वेगळं

दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं


संकटांना सामोरं जायची प्रत्येकाची हिंमत वेगळी

प्रत्येकाने मोजलेली मन:शांतीची किंमत वेगळी

काळापुढे हात न टेकता पुन्हा नव्याने लढणं वेगळं

दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं


प्रत्येकाच्या भावना वेगळ्या

व्यक्त व्हायची रीत वेगळी

एकमेकांना समजून घ्यायची

प्रत्येकाची प्रीत वेगळी

कधी वाटतं तुला कळावं न सांगता सारं सगळं

पण...दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं


समजा सगळीच माणसं

जर एकसारखी असली असती

कंटाळा येऊन जगण्यात मग

मजा काही राहिली नसती

'जितकी लोकं तितक्या तऱ्हा' हाच नियम बरा आहे

आपापल्या तऱ्हा जपणं हाच हेतू खरा आहे

लवकर जमतं ज्याला हे, त्याच्या नशिबी सुख सगळं

कारण...


दोन लोकं समान नसतात...प्रत्येकाचं असणं वेगळं


-शुभदा

०५.११.२०२०

No comments:

Post a Comment

Women's Day

#womensday2023  This morning when my maid didnt turn up, I took over the charge and cooked our meal like any other day. The last minute chan...