एप्रिल मे मधली टळटळीत दुपार असली की अंगाचं कसं पाणी पाणी होतं. 'कसलं मरणाचं ऊन होतं' असं सहज तोंडातून निघून जातं. हल्ली तर मार्च पासूनच उन्हाचे वारे वाहायला लागतात. आणि मग अचानक एके दिवशी सकाळी ऊन गायब होतं. उकाडा तेवढाच पण ऊन नाही...झाडाचं पान हलत नाही. आकाशात ढग दाटतात. पण ते ना धड पाऊस वाहून आणलेले जडसर काळे असतात ना कापूस पिंजल्यासारखे हलके फुलके पांढरे असतात. कुठेतरी मधल्यामधे…पण सूर्य झाकोळून टाकण्यासाठी पुरेसे असतात. ऊन नाही म्हणून बरं वाटावं तर उकाड्याने जीव हैराण. थोड्या थोड्या वेळाने खिडकी बाहेर लक्ष जात राहातं. पण सूर्यनारायण काही दर्शन देत नाहीत. 'मळभ आहे आज. पाऊस पडणार असं दिसतंय'...सहज तेही तोंडातून निघून जातं. पावसाची शक्यता वर्तवत आपण आपल्या कामात मग्न होतो. लक्ष मात्र खिडकीबाहेर…'अजून मळभ आहेच' आपण स्वतःशीच पुटपुटतो. थोडा वारा सुटलाच तर मागून पाऊस येतो. आणि आलाच तर मळभ दूर होतं. आभाळ उघडतं. क्वचित सूर्यनारायण दर्शन देऊन जातात. नाहीतर पाऊस पडून थोडा गारवा तरी येतो वातावरणात. पण पाऊस नाही आला तर मात्र कोंडल्या सारखं वाटायला लागतं...घुसमटल्या सारखं. यापेक्षा ऊन परवडलं असं काहीतरी वाटून जातं. आणि आपण वाट पाहत बसतो...खिडकीबाहेर नजर टाकत, मळभ दूर होण्याची.
मनावरही असं मळभ येतं कधी कधी. मरगळीचे, आळसाचे ढग गर्दी करतात. धड कामही होत नाही आणि धड आरामही नाही. मनमोकळा आनंदही नाही आणि जिव्हारी लागणारं दुःखही नाही. मधल्या मधे झुरणारं मनावरचं मळभ. त्यावर उपाय दोनच...आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टीत मन रमवावं, कामात झोकून द्यावं. किंवा मनात साचलेलं सगळं बाहेर काढावं…लिहून, बोलून किंवा आपल्या जवळच्यांकडे व्यक्त होऊन. दोन्ही नाही शक्य झालं की मळभ दाट होऊ लागतं...मनावरचं ओझं वाढवत वाढवत. मग कुठूनसा वारा येतो...निमित्त होतं आणि अश्रू वाहू लागतात. त्यांना वाहू द्यावं तसंच…ढगात साठलेला पाऊस बरसतो तसं. तो पडून गेला की बरं वाटतं...मोकळं वाटतं. मळभ दूर होतं मग मनावरचं.
आजकालचे दिवस पाहता आजूबाजूला आणि मनावर मळभ दाटून येण्याच्या शक्यता दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शारीरिक आरोग्याची काळजी घेता घेता मानसिक आरोग्यावर पण विशेष लक्ष असू द्यात. आपलं मळभ दाटू लागलं की ज्यात मन रमेल अशा गोष्टींसाठी वेळ काढावा. ज्यांच्याकडे व्यक्त होता येइल अशा व्यक्ती आजूबाजूला असाव्यात. आणि जर आपण धडधाकट असू तर आपल्या जवळच्या व्यक्तींवर थोडं लक्ष ठेवावं. न जाणो आपल्यामुळे कदाचित त्यांचं मळभ दूर व्हावं...
-शुभदा
No comments:
Post a Comment