Saturday, July 25, 2020

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा आणि मी

दिवसाच्या सुरवातीला कामांची उजळणी...

गॅसवर उकळणारा आलं घातलेला चहा…

'चला उठा सकाळ झाली' ची हाक…

अर्धवट झोपेतले पेंगूळलेले डोळे…

इवल्याशा हातांचा गळ्याभोवती विळखा…

दोन मिनिटांत दात घासून पाच मिनिटांत आंघोळ...

नाश्ता पोटात ढकलताना मिळालेला घटकेचा आराम…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मी…


एकीकडे कांदा तर दुसरीकडे टोमॅटो…

कापलेल्या भाज्यांनी बघितलेली मुक्तीची वाट...

कुकरची नेमकी न मोजलेली शिट्टी…

राई-जिरं-कडीपत्त्याची खमंग फोडणी…

तव्यावर गरागरा फिरणारी टम्म फुगलेली चपाती…

इतक्यात वाजलेला ऑफिसचा फोन…

Will revert shortly हे ठरलेलं उत्तर…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

दाटून आलेले ढग आणि मी…


Inbox मध्ये आलेला emails चा पूर…

चार वेळा डोळ्याखालून घातलेली एकच document…

Confcall संपायची आतुरतेने बघितलेली वाट…

त्यात प्रश्न विचारणाऱ्यांना mute वर घातलेल्या शिव्या…

कडकडून भुकेने पोटात ओरडणारे कावळे…

दुपारची जेवणं आणि भांड्यांचा ढीग…

भांडी उरकताना आठवलेली ऑफिसची deliverables…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

रिपरिप सुरू झालेला पाऊस आणि मी…


फोन calls आणि emails नी भिरभिरलेलं डोकं…

Laptop च्या स्क्रीनवर खिळलेले डोळे…

दमून भागून दिलेली एक मोठी जांभई…

अजून अवकाश आहे सांगणारं घड्याळ…

शेजारी बिलगून झोपलेलं काळजीमुक्त पोर…

बालपणच बरं होतं याची पुनःश्च जाणीव…

पुन्हा वास्तवात घेऊन येणारा बॉसचा ई-मेल…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

पावसाचा अचानक वाढलेला जोर आणि मी…


संध्याकाळचा चहा आणि जेवणाची तयारी…

न संपणारी कामं उद्यावर ढकलायची लगबग…

बरंचसं काम पूर्ण झाल्याचा सुस्कारा…

आजूबाजूला पसरलेला खेळण्यांचा ढीग…

लेकीबरोबर पुन्हा लहान होऊन खेळण्याची गंमत…

आनंदाने येऊन बिलगलेले छोटेसे हात…

उद्याच्या लढाईसाठी मिळालेलं मणभर बळ…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

संधीप्रकाशाचा मनोहारी खेळ आणि मी…


म्हणता म्हणता झालेली दिवसाची रात्र…

उद्याची तयारी करून विसावलेला जीव…

गोष्टी ऐकून झोपी गेलेले चिमुकले डोळे…

Earphonesवर गुंजत असलेलं 'फिर वही रात है'...

बाहेर रस्त्यावर सामसूम आणि मंद सुटलेला वारा…

हातात कॉफीचा कप आणि सोबत आठवणींचा दरवळ…

mobileमध्ये कैद झालेल्या सहज सुचलेल्या ओळी…

खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा…

ढगामागून डोकावणारा एक मुक्त चंद्र आणि मी…


-शुभदा

Sunday, July 5, 2020

Lockdown वाढदिवस

यावर्षी आपल्यापैकी बऱ्याच जणांचे वाढदिवस lockdown मध्ये साजरे झाले. नेहमीपेक्षा वेगळ्या असणाऱ्या या celebration बद्दल हे थोडे पांढऱ्यावर काळे…

अगदी लहानपणापासून मला वाढदिवसाचे भारी कौतुक. सुदैवाने जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं हे कौतुक कमी होण्याऐवजी अजून वाढतच गेलं. फक्त त्या कौतुकाचं स्वरूप थोडं बदलत गेलं. आपल्या वाढदिवसादिवशी खूप शुभेच्छा आपल्याला मिळाव्यात एवढीच काय ती अपेक्षा. मला आठवतं एकदा शाळेत असताना नवीन वर्ग असल्याने कोणीच मला वाढदिवसादिवशी wish नव्हतं केलं. कारण कोणाला माहीतच नव्हतं की त्यादिवशी माझा वाढदिवस होता. तसंच काहीसं पुढे पहिल्या job च्या वेळी ऑफिस मध्ये झालं. आणि मग मी ठरवून टाकलं की बस...आता यापुढे आपला वाढदिवस आपणच साजरा करायचा. खूप खुश राहायचं त्यादिवशी. स्वतःला एक मस्त gift द्यायचं. आपल्या घरच्यांसोबत, जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत दिवस घालवायचा.

जे मला जवळून ओळखतात त्यांना माहीत आहे की मी कसं वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासूनच 'मेरा birthday आ रहा है...मेरा birthday आ रहा है' अशी दवंडी पिटवायला सुरुवात करते. एरवी वर्षभर अतिशय matured, थोडीशी serious असा आविर्भाव असणारी मी, वाढदिवसाच्या काही दिवस आधी वयापेक्षा पाच दहा वर्षं लहान होऊन जगण्यात आनंद मानते. कोणाला ते बालिश वाटेल का याबद्दल अजिबात विचार न करता मुक्तपणे स्वतःची हौस भागवण्याचा तो एक प्रयत्न असतो. यावर्षीही उत्साह तोच आहे. पण वाढदिवसाचे स्वरूप थोडे बदलले आहे. यावर्षी वाढदिवस आला तो lockdownच्या काळात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे cakes ची रेलचेल नाही की स्वतःसाठी नवीन कपडे किंवा gift खरेदी करणं नाही. थोडक्यात tangibles नाहीत. पण ते नसल्यामुळे हा वाढदिवस अजून खास झाला आहे. Intangibles चे महत्व अजून प्रकर्षाने जाणवतंय. आजूबाजूला आपल्यावर प्रेम करणारी आपली माणसं असावीत आणि सोबत मनापासून दिल्या गेलेल्या शुभेच्छा…बस एवढ्यावर सुद्धा वाढदिवस साजरा होऊ शकतो हे या lockdown च्या निमित्ताने नव्याने कळतंय.

तशा वाढदिवसाला मिळणाऱ्या शुभेच्छा वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. काही मंडळी रात्री बाराच्या ठोक्याला wish करतात, तर काही दुसऱ्या दिवशी. काही अजूनही हक्काने call करतात, काही whatsapp वर शुभेच्छा देतात तर काही facebook वर. यावेळच्या lockdown मुळे video calls वरही शुभेच्छा दिल्या जात आहेत. यासगळ्यांमध्ये रात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा द्यायला मला विशेष आवडतात. वाढदिवस हा वर्षातला एक खास दिवस असतो, त्यामुळे त्याच्या पहिल्या मिनिटापासूनच तो दिवस त्या व्यक्तीसाठी साजरा व्हावा हा त्यामागे हेतू असतो. अर्थात काही जणांना तो अतिउत्साह वाटतो. मी आजही शक्य असेल तेव्हा रात्री बारा वाजता whatsapp वर message करून wish करणं prefer करते. पण समोरून 'एवढं कशाला जागायचं?' असा सूर आला तर मात्र हात आवरता घेते. आपल्या शुभेच्छांचं समोरच्याला ओझं वाटू नये हेही तितकंच महत्त्वाचं. मला वाढदिवसादिवशी birthday note लिहायलाही आवडतं. अर्थात फक्त त्यांच्यासाठी ज्यांना त्या वाचायला आवडतं. एकूणच, ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात काही सुखाचे, आनंदाचे क्षण आले असतील त्या सगळ्यांच्या वाढदिवसादिवशी आपल्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अधिक खास करावा असं मला वाटतं.

यावर्षी घरातच असल्यामुळे विचार करायला, स्वतः कडे पाहायला वेळ आहे. डोक्यावरचे grey hair of knowledge वाढत चालले आहेत. चेहऱ्यावर अजून सुरकुत्या नाही पडल्या याचं समाधान आहे. मनापासून हसलं की सुरकुत्या पण लपतात म्हणे. त्यामुळे वय वाढेल तसं अजून जास्त हसत राहायचं म्हणतेय. आपल्याला काय करायला आवडतं आणि काय अजिबातच नाही आवडत याची पक्की यादी एव्हाना तयार झाली आहे. त्यानुसार आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करून आनंदी राहायचं हा एकच agenda आहे. आयुष्य almost mid life point वर येऊन पोचलेय. उत्तरार्ध हा पूर्वार्धापेक्षा अधिक exciting असेल अशी आशा आहे. अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, बरेचसे अनुभव घेणं बाकी आहे. बाबा आजारी असताना एक मैत्रीण म्हणाली होती की त्यांचं जगण्यावर प्रेम आहे त्यामुळे ते यातूनही बरे होतील. आणि त्यांनी तशी recovery सुद्धा दाखवली होती. त्यामुळे यापुढे त्यांच्यासारखं जगण्यावर प्रेम करायचं आहे. न जाणो पुढे कधी गरज पडलीच तर तेच पुन्हा उभं राहण्यात मदत करेल.

इथे एकीकडे आई घरी cake बनवण्याची तयारी करतेय. नवरा आणि भाऊ lockdown मध्ये सुद्धा काहीतरी gift deliver होऊ शकेल का ते check करतायत. लेक piggy bank मध्ये जमा असलेले पैसे वापरून dress gift करणार म्हणतेय. यावर्षी lockdown मुळे माझ्या ऑफिसमधल्या दोन जिवलग मैत्रिणींना भेटता येणार नाहीये याचं थोडं वाईट वाटतंय. पण या सगळ्यात आपण यावर्षी जिवंत आहोत 'हेही नसे थोडके' असं समजून मी देवाचे मनोमन आभार मानतेय. शेवटी आपण आणि आपल्या जवळची माणसं जिथे आहोत तिथे सुखरूप आहोत हे समाधानच यावर्षीच्या lockdown वाढदिवसाचं सगळ्यात मोठं gift आहे.

-शुभदा

Sunday, June 21, 2020

थांब ना रे तू...बाबा…

नाती, भावना हे तसे सुद्धा आवडीचे विषय लिहिण्यासाठी. त्यातही आज सगळ्यात जवळचं नातं आणि त्या नात्याशी निगडीत भावना मनात रुंजी घालत आहेत. लिहिलं तर खूप भावनिक होईल का असा विचार मनात डोकावत असतानाच लिहिलं तर मोकळं वाटेल हेही जाणवलं आणि मग त्यातून लिहिला गेला हा लेख…

मुलं आणि वडील यांच्या नात्याबद्दल लिहिताना हमखास ते मुलं आणि आई यांच्या नात्याशी compare केलं जातं. मुलं आईशी मोकळेपणानं बोलतात पण वडिलांशी अंतर ठेवून वागतात… मनातल्या गोष्टी सांगायला आई पण कठीण प्रसंग आला तर बाबा...या आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. पण ही तुलना न करताही ही दोन्ही नाती आपापल्या जागी खास असतात. काळानुरूप या नात्यांमध्येही बरीच स्थित्यंतरं आली आहेत. आपलं आपल्या बाबांबरोबरचं नातं आणि आपलं आपल्या मुलांबरोबरचं नातं यात काही फरक प्रकर्षाने जाणवतात. आपण मोठं होत असताना 'प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्' ही उक्ती अगदी खरी ठरायची. तोपर्यंत आणि अगदी त्यानंतर सुद्धा ती आदरयुक्त भीती कायम असायची...rather असते...अगदी शेवटपर्यंत. आपलं काही चुकलं किंवा चुकतंय असं वाटलं तरी बाबा आधी डोळ्यासमोर यायचे. आणि मग आपसूकच चुकणारं पाऊल बरोबर मार्गी लागायचं. बाबा म्हणजे शिस्त, बाबा म्हणजे धाक, बाबा म्हणजे heroच… कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग काढू शकणारे. पालकांच्या अपेक्षांचं ओझं अंगावर वागवणारी मुलं सगळ्यांना दिसतात. पण आपल्या मुलांसाठी येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करत कधी हार न मानणारे पालक सगळ्यांना दिसतीलच असं नाही. कळत नकळत आपणही आपल्या पालकांवर कधी हार न मानण्याच्या अपेक्षांचं ओझं टाकत असतो. आज पालक झाल्यावर या गोष्टी प्रकर्षाने जाणवतायत. आज जेव्हा लेकीला तिच्या बाबाशी खेळताना बघते तेव्हा जाणवतं की कदाचित आपल्या बाबांबरोबरचं नातं अजून वेगळ्या पद्धतीने निभावता आलं असतं. माझ्यासाठी 'अहो बाबा' होते, तिच्यासाठी 'अरे बाबा' आहे. माझ्या लहानपणी आदरयुक्त भीती होती, तिच्यासाठी ती निखळ मैत्री आहे. मला लहानपणी बाबा त्यांच्या कामामुळे कमी भेटायचे. माझ्या लेकीला माझ्यापेक्षा जास्त वेळ तिचा बाबा देतो. पण हे सगळं असूनसुद्धा बाबांबरोबरचं नातं हे आजही मनाच्या सर्वात जवळचं आहे.

लहान असताना रस्ता ओलांडताना पकडलेला बाबांचा हात...समुद्रात पाय बुडवून उभं असताना, पायाखालची वाळू सरकत असताना पडू नये म्हणून पकडलेला बाबांचा हात...पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला तेव्हा frame adjust करून देणारा बाबांचा हात...काही चांगलं केलं की पाठीवर शाबासकीची थाप मारणारा बाबांचा हात…नमस्कार केल्यावर आशीर्वाद म्हणून मायेने डोक्यावर फिरणारा बाबांचा हात...मोठं झाल्यावर escalator वर चढताना ते पडू नयेत म्हणून पकडलेला बाबांचा हात…वयाच्या पन्नाशीला computer शिकताना mouse हाताळताना पकडलेला त्यांचा हात...लग्न होऊन सासरी जाताना त्यांना घट्ट मिठी मारून रडताना, एकीकडे स्वतःचे अश्रू सावरत दुसरीकडे मला मायेने थोपटणारे बाबांचे हात...पुढे नातीमध्ये लेकीचं बालपण शोधत तिला अंगाखांद्यावर खेळवणारे त्यांचे हात...हॉस्पिटलमध्ये असंख्य tubes आणि pipes मध्ये वेधले गेले असतानासुद्धा मला पाहिल्यावर 'मी बरा आहे' हे सांगण्यासाठी किंचित उंचावलेला बाबांचा हात…त्यांच्या आजारपणाच्या काळात 'होईल सगळं ठीक' असं सांगण्यासाठी हातात घेतलेला त्यांचा हात आणि तेव्हा माझ्या मनाची घालमेल ओळखून मलाच धीर देण्यासाठी अलगदपणे माझ्या हातावरची पकड घट्ट करणारा त्यांचा हात...आणि ते गेल्यावर शेवटचा हातात घेतलेला त्यांचा थंड, निर्जीव झालेला हात...आयुष्यात हे सगळे क्षण आणि त्या निपचित हाताचे वजन मी शेवटपर्यंत विसरू शकणार नाही.

हे नातं, या आठवणी इतर दिवशीही तेवढ्याच खास असतात. पण Father's Day सारखे दिवस आले, की त्या उसळी मारून वर येतात. आणि मग सगळ्याच पाश्चात्य कल्पना वाईट नसतात असं वाटून जातं. Father's Day साजरा करावा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न. पण तरीही आपल्याला इथपर्यंत पोहोचवण्यात ज्यांची पुण्याई कामी आली त्या आपल्या सगळ्यांच्या बाबांना आणि कालानुरूप नात्यांची बदलती रूपं आत्मसात करून पुढच्या पिढीचे मित्र 'बाबा' होण्याचं आव्हान पेललेल्या माझ्या सगळ्या मित्रांना आजच्या दिवशी भरभरून शुभेच्छा!

Happy Father's Day to all the lovely dads out there👍💓

-शुभदा अनंत मेथर




Sunday, June 14, 2020

समुद्र…

अगदी लहानपणापासून माझं समुद्रावर भारी प्रेम. कोकणात थेट किनारपट्टीवर गाव. त्यामुळे लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत आमची समुद्र भेट ठरलेली असायची. सोनेरी वाळूचा विस्तीर्ण पसरलेला किनारा...त्यावर वाकडे वाकडे चालणारे छोटे खेकडे...कडेला नारळाची झोकावणारी उंच झाडं आणि समोर अफाट समुद्र... फेसाळणाऱ्या उंचच उंच लाटांचा अफाट, अचाट समुद्र. उजवीकडून डावीकडे मान फिरवली तरी न संपणारा. सूर्यास्ताच्या वेळी ते लालबुंद सूर्यबिंब स्वतःत विरघळवून टाकणारा...समुद्र…

अगदी लहान असताना बाबांचा हात धरून पाण्यात पाय बुडवायला जायला मज्जा यायची. लाटेचं पाणी ओसरताना पायाखालून वाळू सरकवून जायचे आणि बाबांच्या हातावरची पकड नकळतच अधिक घट्ट व्हायची. पायाखालून वाळू सरकत असेल तर बाबा आहेत सांभाळायला हा विचार तेव्हापासूनच घट्ट रुजला होता मनात. थोडं मोठं झाल्यावर दादाबरोबर वाळूचे किल्ले बांधायचा उपक्रम सुरू झाला. तेव्हा beach toys नव्हते त्यामुळे नारळाच्या करवंट्या, झाडाच्या काड्या अशी indeginous अवजारं घेऊन बांधकाम चालायचं. अंधार पडायला लागला की आमची स्वारी किल्ले सोडून घराकडे निघे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन परत ते किल्ले शोधे. तेव्हा वाळूचे किल्ले क्षणभंगुर असतात हे कुठे माहीत होतं. पुढे मोठं होता होता समुद्राच्या रुपाइतकाच त्याचा आवाज जवळचा वाटू लागला. डोळ्यात देखण्या उसळत्या लाटा आणि कानात त्यांचा मोहिनी घालणारा आवाज यावर कित्येक तास काढू शकत होते मी. यापेक्षा romantic आयुष्यात काही असूच शकत नाही असं ठाम मत होतं माझं. काही शांत समुद्रही भेटले...ज्यांच्या लाटा किनाऱ्यावर धडकायच्या नाहीत तर फक्त किनाऱ्याला स्पर्श करून जायच्या. शाळेतल्या शिस्तशीर मुलांप्रमाणे…त्यात अवखळपणा नसायचा. मग काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. पण कोणत्या का रूपात होईना समुद्र दिसला असं स्वतःला समजावून मी पुढे निघायचे. कोलंबसाच्या गर्वगीतातल्या शेवटच्या दोन ओळी मनाच्या नेहमीच विशेष जवळच्या राहिल्या. शांत समुद्र दिसला की त्या आपोआप ओठावर यायच्या…'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला'...खवळलेल्या समुद्राला हे बोलायची कधी हिंमत नाही झाली पण. अंदमानच्या राधानगर किनाऱ्याची निळाई काही औरच होती...अगदी पुलंच्या निळाईची आठवण करून देणारी. त्यानंतर बरीच वर्षं समुद्र एक मित्र वाटायचा...कधी काळी भेटणारा पण अगदी कालच तर भेटलो होतो असे वाटून गप्पा मारणारा. कुठे माहीत होतं की हे समीकरण कधी काळी बदलणार होतं.

बाबा गेल्यानंतर काही दिवस सगळे विचार, भावना गोठल्यासारख्या झाल्या होत्या. मी धड रडले सुद्धा नव्हते ते गेल्यावर. भेटायला येणाऱ्या लोकांशी बोलत तर होते. पण विषय हाच...की गेल्या आठ महिन्यात बाबांनी कशी आणि किती झुंज दिली. बाबा त्या आठ महिन्यांच्या पलीकडे जाऊन सुदधा खूप काही होते. पण डोकं इतकं बधीर झालं होतं की त्यांच्या आठवणी कुठेतरी हरवल्या सारख्या झाल्या होत्या. कुठेतरी जाऊन कोणाकडे तरी मन मोकळं करावं असं वाटत होतं पण कसं ते कळत नव्हते. आणि एकेदिवशी मी ऑफिस मधून निघून मरीन ड्राईव्ह गाठले. कट्ट्यावर चढून बसले. कानात earphones सरकवले...मी फोन वर बोलतेय असं वाटावं म्हणून. आणि बोलायला सुरुवात केली. समोर तोच समुद्र होता...अथांग पण धीरगंभीर…शांतपणे मला ऐकणारा...माझ्या बाबांसारखा. मी पुढचा अर्धा तास भरभरून बोलले...भरपूर रडले...आणि त्यानंतर मला माझ्या मी शोधत असलेल्या आठवणी सापडल्या...माझ्या आणि माझ्या बाबांच्या आठवणी. त्यादिवसानंतरही मला बराच वेळ लागला या सगळ्यातून बाहेर यायला. पण मला एक हक्काची जागा सापडली जिथे मला माझ्या बाबांच्या आठवणी जगता येणार होत्या. त्यादिवसापासून समुद्र मनाच्या अधिकच जवळ आला.

आजही समुद्र किनारी गेलं की बाबांच्या आठवणी जाणवतात. अस्ताला गेलेलं सूर्यबिंब सांगतं की या जगात नश्वर असं काहीच नाही...दूर हिंदकळणाऱ्या होड्या सांगतात की time to move on. लाटांचा आवाज सांगतो…'मी आहे...मी नेहमीच असेन'. मी पाण्यात पाय ठेवून उभी राहते...लाट ओसरते आणि पायाखालून वाळु सरकते...मी पाय अधिक घट्ट रोवून उभी राहते...बाबा आजही खाली पडू देत नाहीत...

Tuesday, June 2, 2020

नेमेची येतो मग पावसाळा…

जगात दोनच प्रकारची माणसं असतात...एक...ज्यांना पाऊस आवडतो आणि दुसरे म्हणजे ज्यांना पाऊस नाही आवडत. पावसा बाबत indifferent माणूस आजपर्यंत कोणालाही सापडलेला नाही.

प्रत्येकाचा पाऊस वेगवेगळा असतो. लहान मुलांना तो हातावर नाचवायचा असतो. Raincoat आणि छत्री घेऊन पावसात भिजायला जायचे असते त्यांना. आता पूर्वीसारख्या कागदाच्या होड्या नसतील सोडत ते पाण्यात. पण पहिल्या पावसाची उत्सुकता आणि त्याच्या आगमनाचा आनंद अजूनही अबाधित आहे.

Adolescent वयातला पाऊस तसा थोडा फिल्मी असतो. बंधनं झुगारून देणारं वय. त्यामुळे छत्री आणि windcheater मुद्दाम घरी सोडणं आणि बरोबर असलं तरी बॅगेत ठेवणं या pre-conditions असतात पावसाळा अनुभवायच्या.

प्रेमात पडलेलं असताना पाऊस अधिक जवळचा वाटतो. पाऊस पडत असतानाचा संथ मंद प्रकाश, त्याचा बारीक आवाज आठवणींची दारं कधी उघडतात हे लक्षात येत नाही. दिवसा पडणारा पाऊस थोडा रिपरिप नाहीतर एखादी मोठी सर आणि मग शांत असा बरा वाटतो. सोबत मातीचा स्वर्गसुख देणारा सुवास. पण रात्री पडणारा पाऊस मात्र मुसळधारच असला पाहिजे. तो दिसत नाही रात्री. त्यामुळे खिडकीच्या काचेवर आदळणारा, सोबतीला ढगांचा गडगडाट आणि प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा अधिक असतो हे अधोरेखित करणारा विजांचा कडकडाट असा 'जाणवणारा' पाऊस असला म्हणजे खरी गंमत. रात्री मध्येच जाग यावी आणि पावसाने सांगावं 'मी चालू आहे अजून...झोप गप्प'. 

पाऊस तिन्ही सांजेचा आला तर कांदा भजी आणि आलं टाकून केलेला चहा must. पण एकट्याने त्यांचा आस्वाद घेण्यात मजा नाही. त्यासाठी सोबतीला partners in crime हवेत. पण एकट्यानंच जर पाऊस अनुभवायचा असेल तर मात्र चहा ऐवजी गरमागरम वाफाळलेली कॉफी हवी. तिथे पावसाने जोर धरावा आणि इथे कॉफीचा सुगंध दरवळावा. घराबाहेर असू तर एक गरमागरम वडापाव आणि भजी पाव होऊन जावा...तळलेल्या मिरची सकट. थोडक्यात ब्रह्मानंदी टाळी लागण्यासाठी ज्याला जे रुचते त्याला ते मिळावे आणि सोबतीला मुक्तहस्ते बरसणारा पाऊस…

पावसाळ्याच्या गाण्यांची पण मजा काही औरच. ती मोठ्याने गावीत किंवा नुसती ऐकावीत आणि आजूबाजूला पाऊस पडत असल्याचा अनुभव यावा. शब्द जे एरवी बगल देऊन जातात ते पावसात तेच गाणं ऐकत असताना कुठे खोलवर जाऊन भिडावेत. एखादी गजल हळुवारपणे मनात उतरावी आणि त्यातली तबल्यावरची थाप हृदयाचा ठोका चुकवावी. व्हायोलिन च्या तारा छेडल्या की पावसाचा जोर उगाचच वाढावा आणि बासरी वाजली की पाऊस ओसरण्याची चाहूल लागावी. 

आता घर, नोकरी, जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता पावसाचा आनंद लुटणे तसे backseat वर गेलंय. घरातून काय किंवा ऑफिस मधून काय, निघताना पाऊस चालू असेल तर एकच प्रश्न डोक्यात...trains किती late आहेत? पण यावेळेचा lockdown बहुदा घरातून पाऊस अनुभवायची संधी देणार असं दिसतंय. आणि समजा जावंच लागलं ऑफिसला तरी पावसाचा आनंद लुटू नये असं कोणी म्हणत नाहीये. कधीतरी होईलच की सगळं सुरळीत. त्यावेळी एखाद्या दिवशी पाऊस पडत असताना निघायचं ऑफिस मधून...फोन आणि छत्री बॅग मध्ये टाकायची आणि वरून raincover सरकवायचं बॅगवर आणि निघायचं घराकडे यायला. मस्त भिजत भिजत. घरी येऊन गरमागरम पाण्यात आंघोळ आणि मग वाफाळलेली खिचडी. झोपायच्या आधी खिडकीत उभं राहून पाऊस बघत बघत गरमागरम कॉफी प्यायची. आणि कानावर headphone चढवून एखादी गजल ऐकत शांत पहुडायचं. सुख म्हणतात ते नेमकं हेच असावं कदाचित.

इतके पावसाळे बघितले असं म्हणत इथपर्यंत पोहोचलेल्या सगळ्यांनाच यावर्षीच्या पुन्हा नव्याने अनुभवता येणाऱ्या पावसाळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

-शुभदा

Monday, April 6, 2020

एक कोपरा...

तीन खोल्यांचं घर आणि साडे तीन माणसं
बरेच दिवस एकत्र राहिले नव्हते ते फारसं

सकाळी उठून प्रत्येकाला कामाला जायची घाई
एकमेकांशी बोलायची मुळी उसंतच कोणा नाही

तिचे weekdays धावपळीचे, त्याचे weekends busy
एका छताखाली राहून एकत्र राहणं तेवढंही नव्हतं easy

Parentingच्या जबाबदाऱ्या वाटलेल्या, कामाची योग्य वर्गवारी
आपापली कामं निभावण्याची दोघांचीही धडपड भारी

चांगले पालक होताना partners होणं मागे पडत होतं
आपला संवाद कमी पडतोय हे दोघांनाही कळत होतं

थोडासा वेळ प्रत्येकाला स्वतःसाठीपण हवा होता
थोडंसं विसवण्यासाठी प्रत्येकाला स्वतःचा कोपरा हवा होता

असा वेळ मिळाला की तो mobile वर webseriesमध्ये हरवायचा
तिला तिचा विरंगुळा earphones वर गाण्यांमध्ये सापडायचा

मग आला lockdown आणि घराबाहेर पडणं अचानक बंद झालं
सक्तीने का होईना एकत्र राहणं प्रत्येकाच्या नशिबात आलं

पहिल्या दिवशी सगळे एकमेकांना नव्याने भेटले
Work from home च्या नावाखाली कोपरे त्यांनी वाटले

त्याचे calls, तिचे mails, आजूबाजूला बागडणारी चिमुकली
त्यांच्या online meetings तर तिची छोटीशी भातुकली

आधी एकमेकांशी फोनवर बोलणारे ते आता समोरासमोर बोलू लागले
एकमेकांच्या professional life चे टक्केटोणपे त्यांना आता चांगलेच कळू लागले

तिचा धीर खचू लागला की तो तिला सावरायचा
तिची meeting लांबली की घरातलं सगळं आवरायचा

तिलाही त्याचं सोबत असणं खूप सुखावू लागलं
इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा समाधान खुणावू लागलं

सगळ्या आघाड्या सांभाळताना कामाचे तास वाढले होते
पण आपली माणसं आजूबाजूला आहेत हे सुख तरी कुठे कमी होते

वादविवादांची जागा आता हळूहळू संवादाने घेतली होती
काळानुरूप वाढलेली अंतरं आता थोडी थोडी मिटली होती

एकत्र चहा, एकत्र जेवण आता जगण्याचे नवे नियम बनले होते
संकटाच्या काळाने जणू नात्याचे घट्ट बंध विणले होते

रोजच्या आव्हानांचा काही काळ तरी दोघांना पडला विसर
कोपऱ्यांच्या सीमारेषाही मग हळूहळू होत गेल्या धूसर

-शुभदा

Friday, February 14, 2020

प्रेम म्हणजे

Valentine Day जवळ आला की एकूणच सगळीकडे प्रेम, त्याच्याशी निगडित गोष्टी दिसायला लागतात. मग त्या tv serials असो किंवा advertisements किंवा gift galleries… सगळ्याच गोष्टी Valentine Day जवळ आल्याची वर्दी देत असतात. Valentine Day साजरा करावा अथवा नाही, पाश्चात्य संस्कृती की भारतीय संस्कृती या वादांमध्ये न अडकता केवळ प्रेमावर लिहायचा मूड होता. म्हणून हा लेख...direct दिल से…

लहानपणापासून आपण बऱ्याच मूर्त-अमूर्त गोष्टी शिकत असतो. त्यात बऱ्याच अंशी जगण्यासाठी आवश्यक अशा skills चा समावेश असतो. आपण कधी चुकतो आणि त्यातून शिकतो तर कधी स्वतः न चुकता इतरांच्या चुकांमधुन शिकतो. पण या सगळ्यात आपण भावना ओळखणं शिकत नाही. कारण त्यांची गणती skills मध्ये होत नाही. कोणी म्हणतं ते उपजतच असतं. आज स्वतः पालक झाल्यावर जाणवतं की भावना योग्य रित्या ओळखायला शिकवलं तर मुलांचं बरंचसं मानसिक द्वंद्व कमी होऊ शकतं. असो…तर मुद्दा हा आहे की जसे आपण वयाने मोठं होत जातो तसे आनंद, दुःख, राग, दया, माया या भावना आपण समजू लागतो आणि express ही करु लागतो. पण जे शिकवले जात नाही ते म्हणजे 'प्रेम'. या अमुक अमुक गोष्टी म्हणजे प्रेम असे कोणीही आपल्याला कधी शिकवत नाही. त्यामुळे कळत्या पण अभ्यासाच्या वयात नसत्या गोष्टी नकोत डोक्यात या विचाराने 'प्रेम' हे backseat घेतं. आताच्या काळात कदाचित संदर्भ बदलले असतील कारण एकूणच मुलांचं exposure प्रचंड वाढलं आहे. पण आपण वयात येताना गोष्टी खूप वेगळ्या होत्या...साध्या होत्या.

तेव्हाही प्रेम तसे cinematic च होतं. आपल्या मनातल्या त्या भावना ओळखणं हे तसं कठीण जायचं. इंग्रजीमध्ये प्रेमाला बरेच फाटे फुटलेले असायचे...crush, attraction, infatuation, like, love असे काहीसे. मराठीमध्ये मात्र प्रेम म्हणजे फक्त कोणीतरी 'आवडणं' एवढंच असायचं. आपल्या वेळी teenage concept नव्हती. पण १४-१५ व्या वर्षी हळूहळू कोणी थोडं special वाटायला लागलं की जाणवायचं…हे काहीतरी वेगळं आहे आणि adolescence stage सुरू झाल्याचं लक्षात यायचं. कोणाचं तरी आजूबाजूला असणं आपोआपच चेहऱ्यावर एक चमक घेऊन यायचं. संवाद होईलच असं जरुरी नसायचं. त्या व्यक्तीला आपल्या भावना कळाव्यात असे compulsion ही नसायचं. फक्त ती व्यक्ती रोज दिसावी, नेहमी हसावी, कधीतरी आपल्याशी थोडं बोलावी आणि अगदीच नाही तर फक्त नजरानजर व्हावी एवढीच काही ती प्रेमाची परिभाषा असायची. पुढे जसजसे मोठे होत गेलो तशी हि परिभाषा थोडी रुंदावत गेली. ऐन उमेदीच्या काळात कॉलेज मधील मुला मुलींमधली मैत्री ही मूळातच नवीन कल्पना होती. मैत्री ही gender specific नसते हा साक्षात्कार त्याकाळात नव्याने झाला. Professional studies च्या race मध्ये आपली नेमकी स्वप्नं काय ते ओळखून, त्यांना सांभाळत पुढे पळताना एखाद्या समविचारी मित्राचा विशेष आधार वाटायचा. तासनतास गप्पा, त्यात रमताना जगाचा विसर, मनातल्या भावना त्या मित्र/मैत्रिणीला सांगाव्यात की नाही हे द्वंद्व, सांगितले तर मैत्री तुटेल का ही भिती...असं काहीसं प्रेम असायचं ते. प्रेम कमी आणि मैत्री जास्त. कारण त्याचं/तिचं दुसऱ्या कोणाशी सूत जुळत असेल तर मदत करायलाही मागे पुढे न पाहणारं निर्व्याज प्रेम असायचं ते. काही निवडक लकी लोकांना मैत्रीमध्ये त्यांचं प्रेम सापडायचं आणि इतरांना विरहगीतांच्या शब्दांमध्ये…'हम लबोंसे कह ना पाए उनसे हाल-ए-दिल कभी...और वो समझे नही ये खामोशी क्या चीज है' यात जगण्याचं सगळ्यात मोठं सत्य लपलेलं असायचं. पुढे आयुष्याचा जोडीदार निवडायची वेळ आली आणि arrange marriage च्या process मध्ये प्रेम वगैरे परत backseat वर गेलं. वेळच नाही मिळाला प्रेमात पडायला असं स्वतःला समजावत आता लग्न करून बघू प्रेमात पडता येतेय का असं काहीसं ते होतं. ठरवून प्रेमात पडता येत नाही पण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा काहीच ठरवता येत नाही हे कळलं. तोपर्यंत आपल्याला कोणीतरी आवडणं हे प्रेम असायचं. आता आपण कोणालातरी आवडणं हेही प्रेमच असतं हे लक्षात आलं. कुणी म्हणेल प्रेमात पडावं असं कोणी आयुष्यभराचा जोडीदार म्हणून मिळालं की झालं...प्रेम पूर्णत्वाला पोहोचलं. पण तसं नाही होत. उलट प्रेमाच्या कक्षा रुंदावतच जातात. कोर्टशिपच्या दिवसात गुलाबीसर वाटणारं प्रेम जेव्हा लग्न होऊन एका छताखाली राहायला लागतं तेव्हा त्यातले अजून कंगोरे डोळ्यासमोर येतात. प्रेम हे आवडण्या पलीकडे जाऊन एकमेकांना समजून घेणं, आधार देणं, जबाबदाऱ्या वाटून घेणं हेही असतं हे जाणवतं. एकमेकांची प्रत्येक गोष्ट एकमेकांना पटावीच असं काही नाही. आपापली individuality सांभाळून एक चांगली टीम बनून पुढे जाता येतं हे हळुहळू कळतं. वयानुरूप प्रेम अधिक परिपक्व होत जातं. एकमेकांना त्यांची space देताना प्रेम बंधनकारक न राहता मोकळं होत जातं. आणि प्रेमाचे असेच छोटे छोटे बारकावे जाणून घेण्यात आयुष्य पुढे सरकत जातं.

अशा या प्रेमाला आपण बऱ्याच वेळा गृहीत धरून चालतो. आजही आपण प्रेमाबद्दल बोलायचं म्हटलं तर हात आखडता घेतो. प्रेम व्यक्त करणं वगैरे गोष्टी आपल्याला तितक्याशा महत्वाच्या वाटत नाहीत. But...to tell you the truth...Life is too short to miss the chances. Valentine Day फक्त निमित्तमात्र आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे तो साजरा करावा का नाही हा भाग अलाहिदा. पण त्यानिमित्ताने का होईना आपलं प्रेम पुन्हा व्यक्त करण्यात काहीच हरकत नाही असं वाटतं.

So तुम्हाला आणि हा लेख वाचत असताना तुमच्या डोळ्यासमोर येऊन गेलेल्या सगळ्यांना Happy Valentine's day! 

-शुभदा

Women's Day

#womensday2023  This morning when my maid didnt turn up, I took over the charge and cooked our meal like any other day. The last minute chan...